खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली बहुचर्चित कादंबरी. खंडेराव हा या कादंबरीचा नायक. या नायकाच्या आत्मसंवादातून लेखकाने भूत आणि वर्तमानातील माणसाच्या जगण्याचा मोठा पट मांडला आहे. मोठा आवाका असलेली अशी कादंबरी मराठीत दुर्मिळच. साहजिकच कौतुक, वाद, टीका असं सारं काही या कादंबरीच्या बाबतीत होत आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलेली या कादंबरीची चिकित्सा.
ह्या विश्वभानाच्या घोंघावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो
आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा, न ढळो
हे पहाटी पांघरलेले दाट झाडांतून डोकावणारे रोशन सूर्य
या खिन्न विनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो
अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्रगंधी धूळ,
साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ.
-भालचंद्र नेमाडे
‘हिंदू-’चा उपोद्घात.
खानदेशातल्या खंडेरावाची ही गोष्ट. सांगतोय कोण, तर खंडेरावच. पण खरं तर तो सांगतही नाहीये. मुख्यत: स्वत:शीच बोलतोय तो. एका बऱ्यापैकी संपन्न शेतकरी कुटुंबातल्या खंडेरावाचे वडील नुकतेच मृत्यू पावले आहेत आणि (त्याचा दुसरा भाऊ आधीच वारलेला असल्यामुळे) घराचं कर्तेपण आता खंडेरावाच्या खांद्यावर येऊ घातलं आहे. पण खंडेराव तर किती तरी आधीपासूनच कुटुंबापासून दूर गेला आहे. त्याला नातेवाइकांचे उबगवाणे हिशेब आणि शेतीमधली सामूहिक असुरक्षितता यांच्याबद्दल पूर्वापार तसा दुरावाच. पुस्तकं वाचावीत, स्वत:ला प्रश्न विचारावेत, जगाकडे तिरकस आणि चौकस नजरेनं पाहावं- आणि हे सगळं करण्यासाठी कुटुंब, गाव, शेती यांच्यापासून बाजूला राहावं, अशीच खंडेरावाची नेहमीची धडपड. टूरिस्ट गाइड बनण्याचा एक कामचलाऊ कोर्स करण्याच्या निमित्ताने तो गावाबाहेर पडतो, मग मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आर्किऑलॉजी शिकायला लागतो, आणि पुढे पीएचडीसाठी संशोधन करताना वडलांचा मृत्यू त्याला त्याने जे जे काही दूर ठेवायचा प्रयत्न केला त्या सगळ्या रगाड्याकडे परत ओढून आणतो.
‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी तब्बल ६०३ पानांची आहे. (लवकरच तिच्यावर लिहिल्या गेलेल्या पानांची संख्या त्याहून जास्त होईल!) अशा या कादंबरीला हे एकदम सुटसुटीत कथानक. वडील आजारी असल्याचं खंडेरावाला कळतं तिथपासून वडिलांच्या मृत्यूनंतरचे वेगवेगळे विधी करून सुतकातून मोकळं होण्याच्या दिवसापर्यंतचा काळ हा या कादंबरीचा मुख्य कालखंड; पण खंडेरावाच्या आयुष्यातल्या या एका घडामोडीच्या आणि मर्यादित कालखंडाच्या उंबरठ्यावर उभा राहून खंडेराव स्वत:शी जे बोलतोय त्याला मात्र स्थळ-काळ-व्यक्ती यांच्या मर्यादा नाहीत. त्या आत्मसंवादातून ही कादंबरी उलगडते. म्हणजे एकापरीने खंडेरावाचं साधारण पंचवीस-तीस वर्षांचं आयुष्य आणि त्या आयुष्यात त्याने गाव आणि कुटुंबाबद्दल साचवलेल्या समज-अपसमजांच्या राशी या निमित्ताने तो धुंडाळत-उलगडत बसला आहे. त्यामुळे ही कादंबरी खानदेशातून पाकिस्तानात, तिथून मराठवाड्यात, अशी कुठेही संचार करते आणि भूतकाळाचा कोणताही कोनाडा तिला वर्ज्य नाही.
अर्वाचीन मराठी साहित्याचा एकूण आवाका आणि दारिद्र्य लक्षात घेता ‘हिंदू-’ ही काही मराठीला शोभणारी कादंबरी नाही. त्यामुळे या कादंबरीवर कौतुक-निंदेचा आणि बक्षिसांचा कितीही वर्षाव झाला तरी ती कादंबरी नेमकी काय म्हणते आहे/ काय करते आहे याचा शोध जिकिरीचाच ठरेल. कारण तिला तोलण्याचा मानदंड मराठीत सहजी उपलब्ध नाही. गेली सुमारे पंचवीस-तीस वर्षं या कादंबरीच्या आगमनाबद्दल अधूनमधून बोललं जायचं. कारण नेमाड्यांनी ‘हिंदू’ या नावासह कादंबरीलेखनाचा मनोदय पूर्वीच जाहीर केला होता. पुढे ते स्वत:च जगण्याच्या समृद्ध अडगळीत अडकले. असं म्हणतात, की कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि प्राध्यापक म्हणून असणाऱ्या जबाबदाऱ्या मनोभावे (इमाने-इतबारे) पार पाडण्याच्या अट्टहासापायी कादंबरीलेखन लांबलं. (प्राध्यापकांना भरपूर काम असतं, हे भारतात तरी कधी ऐकलं नव्हतं. पण नेमाड्यांचं सगळंच वेगळं.) गमतीचा भाग म्हणजे प्रत्यक्षात ही कादंबरी येऊन, वाचली जाऊन तिचा गवगवा होऊ लागण्यापूर्वीच नेमाड्यांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस झालीसुद्धा होती. कारण या कादंबरीच्या महतेबद्दल अनेक हितचिंतकांना खात्री होती. (जशी ओबामांच्या नोबेल कर्तृत्वाबद्दल जगाला आधीपासून खात्री आहे तशीच!) पण हा वाह्यातपणा बाजूला ठेवू आणि ‘हिंदू-’चा विचार करू.
एव्हाना बहुतेक पुरोगामी मंडळींनी कादंबरीतील जातिप्रश्नाच्या आकलनाच्या मुद्द्यावर बोट ठेवून या कादंबरीवर बऱ्यापैकी कडक टीका केली आहे. दुसरीकडे, या कादंबरीच्या शीर्षकातल्या ‘हिंदू’ शब्दामुळे कान टवकारलेल्या आणि डोळे वटारलेल्या काही हिंदू संघटना ‘अडगळ’ शब्दामुळे बिथरल्या. (जालन्यात तर नेमाड्यांना पोलिस संरक्षणात शहराबाहेर पोचवावं लागलं. त्या निमित्ताने पोलिस संरक्षणाचा मान मिळणारे नेमाडे हे पहिलेच (?) मराठी साहित्यिक ठरले!) अशा टोकाच्या प्रतिक्रिया हे समाजाच्या अपरिपक्वतेचंही लक्षण आणि कादंबरीमधल्या शक्यतांच्या श्रीमंतीचंही लक्षण म्हणायला हवं. त्यामुळेही या कादंबरीविषयी लिहिणं अवघड ठरतं.
इतर कोणत्याही मुद्द्याविषयी लिहिण्याआधी या कादंबरीचं एक महान श्रेय नोंदवायला हवं. ते म्हणजे या कादंबरीतली मराठी भाषा. मराठीबद्दल रडून रडून बोलण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे; पण ‘हिंदू’ मध्ये आपल्याला आत्मविश्वाबसाने ओतप्रोत भरलेली, संवादात कोठेही न अडखळणारी सशक्त मराठी भेटते आणि दिपवून टाकते. या कादंबरीतली मराठी हा खरं तर स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा, संवादभाषा आणि निवेदनभाषा, अशा भिन्न रूपांमध्ये ‘हिंदू-’ मधली मराठी सहजगत्या वावरते. तिला जसे बोलीभाषांविषयी ‘पुरोगामी’ प्रश्न पडत नाहीत तसेच जुनी-नवी, शुद्ध-अशुद्ध यांचेही प्रश्न पडत नाहीत. स्वत:च्या कथनावर लेखकाचा विश्वास असला आणि निवेदनाची ऊर्मी असली की भाषा कशी साकारते याचा विस्फारून टाकणारा अनुभव ही कादंबरी देते. अर्थातच त्याची इथे जास्त चर्चा केलेली नाही, कारण तो या लेखाचा मुख्य विषय नाही.
खंडेराव काय म्हणतो आहे याचा अर्थ शोधणं आणि नेमाडे काय सांगताहेत याचा अंदाज घेणं एवढ्यापुरताच हा लेख मर्यादित आहे.
-१-
माणसांची आयुष्यं म्हणजे फक्त बुडबुडा; पण तो निरर्थक न ठरो... सभोवताल खिन्न असला तरी जगण्याची समृद्ध अडगळ घर भरून राहो, या सदिच्छेने सुरुवात करीत नेमाडे आपल्यापुढे खंडेरावाची गोष्ट मांडतात. आपण खंडेरावाच्या गोष्टीचं जेमतेम पहिलं पान उलटतो आणि एक धारदार द्वैत खंडेराव आपल्या पुढ्यात आणून उभं करतो : श्रमकेंद्री कृषिसंस्कृती आणि तिच्या मुळावर उठलेली ‘नागरी, ऐतखाऊ’ संस्कृती. तरी आधीच खंडेरावाला बजावलेलं आहे, ‘खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.’
माणसांची आयुष्यं म्हणजे फक्त बुडबुडा; पण तो निरर्थक न ठरो... सभोवताल खिन्न असला तरी जगण्याची समृद्ध अडगळ घर भरून राहो, या सदिच्छेने सुरुवात करीत नेमाडे आपल्यापुढे खंडेरावाची गोष्ट मांडतात. आपण खंडेरावाच्या गोष्टीचं जेमतेम पहिलं पान उलटतो आणि एक धारदार द्वैत खंडेराव आपल्या पुढ्यात आणून उभं करतो : श्रमकेंद्री कृषिसंस्कृती आणि तिच्या मुळावर उठलेली ‘नागरी, ऐतखाऊ’ संस्कृती. तरी आधीच खंडेरावाला बजावलेलं आहे, ‘खंडेराव, फक्त गोष्टच सांगत जा राव.’
आणि मग पुढे खंडेराव आपलं आयुष्य, आपलं गाव, कुटुंबाचा आणि गावाचा इतिहास, सिंधू संस्कृतीचा इतिहास यांची गोष्ट करता करता याच द्वैताचे अनेकविध पदर आपल्यापुढे उलगडत राहतो. चमकदार चिकित्सा, भारावणारी वर्णनं, संयत भावनिकता, श्रीमंत शायरी, भरगच्च शिव्या (उर्दू शायरी आणि मराठी वळणाच्या शिव्या. त्यामुळे असं म्हणतात, की नेमाड्यांना महाराष्ट्र उर्दू अकादमीची शिष्यवृत्ती द्यावी की साहित्यसंस्कृती मंडळातर्फे शिव्यांचा शब्दकोश बनवण्यासाठी पाचारण करावं यावर चर्चा चालू आहे.) आणि रांगडेपणा या सगळ्यांमधून सतत डोकं वर काढत राहतात ती दोन परस्परविरुद्ध अस्तित्वं. गाव आणि शहर. शेती आणि बिगरशेती व्यवस्था. आधुनिक आणि आधुनिकपूर्व. पुरुषसत्ता आणि त्यात अवकाश शोधणाऱ्या स्त्रियांची धडपड. या सगळ्या द्वैतांमधली विषमता खंडेराव नेमकी पकडतो. प्रत्येक द्वैतातला वर्चस्वसंबंध तो शोधत आणि सांगत जातो. नुसता सांगून थांबत नाही. प्रत्येक वर्चस्वसंबंधातल्या कनिष्ठाची तो बाजू घेतो. अशा प्रकारे कनिष्ठाचा पक्षपात करणारी निवेदनं कादंबरीभर पसरलेली आहेत. ग्रामीण, शेती, ‘कनिष्ठ’ मानलेल्या जाती, भटके, बायका, असं करीत करीत माणूस आणि जनावरं यांच्यात खंडेराव जनावरांचा पक्षपाती आहे!
पण म्हणजे ही कादंबरी सरसकट आणि थेटपणे अन्यायाचा विरोध करते का? तर तसं काही घडत नाही. फक्त निवेदक खंडेराव याला अन्यायग्रस्तांच्या अन्यायग्रस्ततेची जाणीव आहे आणि त्या अन्यायग्रस्ततेची कारणमीमांसा करण्याची त्याची मनातल्या मनात धडपड चालू आहे.
नेमाड्यांचा निवेदक ही कारणमीमांसा कशी करतो? कादंबरी सुरू होते ती नागरी संस्कृतींच्या धिक्काराने. त्यामुळे समाजातल्या ‘बिघाडी’ची मीमांसा करण्याचा एक रस्ता उलगडतो. जेव्हा नागरी संस्कृती वरचढ होतात तेव्हा विरुद्ध श्रेयसाचा संकोच होतो. या आकलनात- त्याच्या पोटात गाव विरुद्ध शहर आणि शेती विरुद्ध उद्योग-व्यापार अशा दोन द्वैतांचा समावेश आहे. ‘...ही खेडी अशी निष्पाप, साधी, उदार मनाची राहतील?’ असा सवाल नेमाड्यांचं एक पात्र विचारतं (पान २७). हे खरं तर वाचकाला एकदम सावध करणारं वाक्य म्हणायला हवं. कारण त्यातून एका बाजूला खेड्याची एक आदर्शवत कल्पना प्रस्थापित होते, तर दुसरीकडे शहर म्हणजे लबाडी, गुंता, अनुदारपणा यांचं कोठार, असं दुसऱ्याच टोकाचं चित्र तयार होतं.
अशी खेडी कुठे असतात हो? पण लहान वस्त्या, अ-नागरी समुदाय हे जास्त सुटसुटीत, बहुविधतानुकूल, समावेशक असतात, असं उदात्तीकरण मांडणारा एक विचारप्रवाह अस्तित्वात आहे. त्याचं प्रतिनिधित्व हा बेटा खंडेराव करतोय की काय?
अशी खेडी कुठे असतात हो? पण लहान वस्त्या, अ-नागरी समुदाय हे जास्त सुटसुटीत, बहुविधतानुकूल, समावेशक असतात, असं उदात्तीकरण मांडणारा एक विचारप्रवाह अस्तित्वात आहे. त्याचं प्रतिनिधित्व हा बेटा खंडेराव करतोय की काय?
पण खंडेराव लबाड किंवा दांभिक नाही. त्यामुळे गोष्ट सांगण्यात तो रमत जातो, तसा मोरगावाच्या भानगडी, तिथल्या कमतरता यांच्याबद्दलही दिलखुलासपणे बोलतो. म्हणजे कादंबरीत आपल्याला ‘गाव’ नावाची एक आदर्श संकल्पना भेटते आणि एक खरंखुरं गावही भेटतं. ते गाव ‘खरं’ आहे. त्याच्याबद्दल कादंबरीकार हातचं राखून ठेवत नाही. पण तरीही खंडेरावाचं मोरगाव हे त्याच्या आदर्शवत गावाच्या संकल्पनेतून साकारलेलं पिल्लूच आहे. त्यामुळे त्याचा ‘खरेपणा’ सांभाळत या कादंबरीत पानंच्या पानं ग्रामव्यवस्थेची गौरवगीता पुन्हा पुन्हा आळवली जाते. (या गौरवगीतेतच शेतीव्यवस्था/शेतकरी आणि गावातली जातिव्यवस्था यांचेही स्वतंत्र अध्याय येतातच.)
गावाच्या नावाने कढ आणत स्मरणरंजन करणारे नमुने मराठी साहित्यात बक्कळ सापडतील. तेच नेमाडेही करत असते तर आपण त्यांना ‘बिच्चारे नेमाडे’ असं म्हणून सोडून दिलं असतं. पण नेमाड्यांचा खंडेराव खंबीर भूमिका घेतोय. उदाहरणार्थ, तो गाव म्हणजे गरीब (शेतकरी), असं समीकरण मांडतो आणि ‘नैतिकतेचं ओझं वाहत आल्यानं’ हे लोक जगात हास्यास्पद ठरले की काय, अशी शंका व्यक्त करतो. गावातली व्यक्तिचित्रणं किती सहृदयपणे येतात हे कादंबरीत मुळापासूनच वाचण्यासारखं आहे. त्याउलट, शहरांबद्दल बोलताना खंडेराव तिथल्या कष्टक-यांना, गरिबांना विसरून जातो आणि नेमकी उदाहरणं देतो ती पैसेखाऊ, दारुड्या किंवा बाईबाज लोकांची. गावातल्या काही मुलींसाठी शहरातले जोडीदार निवडण्याचे आग्रह धरले गेले, हे वाचताना आपल्याला क्षणभर वाटतं, की गावातल्या भानगडी आणि घुसमटीतून काहीजण बाहेर पडतायत असं खंडेराव म्हणतोय- ‘खेड्यातल्या या दोड्या वाड्यांपेक्षा शहरातली भाड्याची का होईना, एक खोली बाईला सुखाची होते...’ (१८९). पण नेमक्या त्याच मुलीच्या आयुष्याची परवड झाल्याचा उल्लेख (५८४-८६) न चुकता येतो!
ग्रामीण जीवनातील त्रुटी मान्य करतानाच ही कादंबरी अगदी स्पष्टपणे ‘ग्रामीण म्हणजे अस्सल’ अशी भूमिका घेते आणि त्या अस्सलाच्या पलीकडच्या शहरीपणावर तुटून पडून जमेल तेवढे बोचकारे घेते. त्यासाठी अर्थातच जशी ‘ग्रामीण’ नावाची एक उदात्त/आदर्श वस्तू कल्पिली आहे, तशीच खंडेरावाने शहरी जीवनातल्या मर्यादा व विपर्यास ठळक करून-बटबटीत करून ‘शहरी’ नावाची एक खुजी/रोगट वस्तू कल्पिलेली दिसते. खंडेराव युनेस्कोच्या शिष्यवृत्तीसाठीच्या चर्चासत्रात निबंध सादर करून एक ‘दे दणादण’ भाषण करतो (त्याची चर्चा पुढेही करूच), त्या वेळी तिथे त्याचा गावातला वर्गमित्र अचानक हजर असलेला खंडेरावाला दिसतो. त्याचं हे वर्णन पहा : ‘भयंकर न धुतलेला मफलर, घामनक्षीची गांधी टोपी आणि पूर्ण काळी होत आलेली सदऱ्याची परंतु चर्चासत्रात जमलेल्या त्या हॉलमधला सर्वांत तेजस्वी चेहरा (५४९). तेजस्वी का रे बाबा? तर खंडेरावाच्या डोळ्याला त्या रघू नायकचं तेज दिसलं म्हणून! आणि मग त्या रघूचा बेहद्द लोभसवाणा संवाद सुरू होतो. आपल्या घामनक्षीच्या टोपीचं त्यालाही भान आहेच आणि आपण आणि हे शहरी ‘बुद्धिजीवी’ यांच्यातल्या विरोधाभासाचीही त्याला जाणीव आहे. (शेवटी खंडेरावाचाच तो मित्र!) त्यामुळे मग लेखक रघूच्या तोंडून शहरीपणावर बोचकारा काढतो : ‘....आम्ही कष्टकरी लोक असेच राहणार. (परिस्थितीमुळे की निवड म्हणून? हा प्रश्न रघू किंवा खंडेराव विचारत नाहीत, कारण त्यांना ‘असेच राहण्याचे’ कुठे तरी उदात्तीकरण करण्याचा मोह पडतोय.) तुम्ही बुद्धिजीवी राहा गांडींना पावडरी न् अत्तरं लावून छानछोकीत.’ (५४९) छानछोकी आणि त्या छानछोकीची ही कल्पना शहरीपणाशी जोडून गाव आणि शहर यांचं द्वैत रंगवणं कित्ती कित्ती सोपं किनई खंडेराव?
‘ऐतखाऊ’ नागरी संस्कृतीची चिकित्सा करण्यासाठी गरज होती ती तिच्या शक्तिस्थानांसह तिच्या हतबल मर्यादांची गोष्ट सांगण्याची, स्वप्नं दाखवून ती अपुरी ठेवण्याच्या तिच्या कमकुवतपणावर बोट ठेवण्याची. नेमाडे दोन्ही बाजूंनी सोपा मार्ग चोखाळतात. एक तर ते गाव नावाची एक आदर्श गोष्ट रचतात आणि दुसरीकडे शहर नावाचा एक विक्राळ खलनायक रंगवतात. हे अर्क चित्रीकरण त्यांच्याच वैचारिक प्रकल्पाला हानी पोचवणारं आणि त्यांना स्मरणरंजनशील ‘गड्या आपुला गाव बरा’ वाल्या मराठी साहित्यिकांमधला एक जरा जास्त स्मार्ट झीलकरी बनवणारं आहे.









