Wednesday, 8 March 2017

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव! -- सुहास पळशीकर (Page 3)

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली बहुचर्चित कादंबरी. खंडेराव हा या कादंबरीचा नायक. या नायकाच्या आत्मसंवादातून लेखकाने भूत आणि वर्तमानातील माणसाच्या जगण्याचा मोठा पट मांडला आहे. मोठा आवाका असलेली अशी कादंबरी मराठीत दुर्मिळच. साहजिकच कौतुक, वाद, टीका असं सारं काही या कादंबरीच्या बाबतीत होत आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलेली या कादंबरीची चिकित्सा.
-३-
पण त्याआधी गाव आणि कृषिसंस्कृती यांचं समर्थन केल्यामुळे खंडेरावाच्या समाजशास्त्रीय आकलनाला मिळणाऱ्या आणखी एका कलाटणीची नोंद घ्यायला हवी. गाव म्हटलं की गावगाडा आलाच. पाचपंचवीस जातीही आल्याच. त्यांच्याबद्दल ‘हिंदू-’ काय म्हणते? खंडेरावाच्या या गावाचा सामाजिक परिसर कुणबीप्रधान आहे, कारण तो शेतीसमाजाबद्दल सांगतोय. आता, शेतकऱ्यांना ‘कुणबी’ असं आवर्जून म्हणणं ही अर्थातच काळजीपूर्वक केलेली निवड आहे. काही शिक्षित अज्ञजन म्हणतील, की हे मराठे आहेत. किंवा खानदेशातल्या एका जातीचं ‘कुणबी’शी साधर्म्य आहे, असंही म्हणता येईल. पण ‘कुणबी’ या नामचिन्हातून वर म्हटल्याप्रमाणे गरीब शेतकरी सूचित होतो. जमीनदार ते वेगळे. शेतकरी आपला कुणबीच, आणि म्हणून तो गावाशी, गावाच्या समाजव्यवस्थेशी एका बरोबरीच्या नात्याने जोडला जातो, जोडलेला असतो, असं कुणबी या नामचिन्हातून सूचित होतं. जणू खंडेराव म्हणतोय, की मराठा, मराठा वर्चस्व ही सगळी वसाहतकाळातील व वसाहतोत्तर काळातील रचिते आहेत. प्रत्यक्षात ग्रामीण, शेतीप्रधान समाजात सर्वच जाती शेतीच्या अर्थव्यवस्थेने घट्ट जोडलेल्या होत्या, आणि त्यात थोडं वर-खाली असलं तरी गावात मराठे कुठे असतात, तिथे तर सगळे शेतकरी कुणबीच असतात- हा सगळा युक्तिवाद कुणबी या नामचिन्हाच्या निवडीत अभिप्रेत आहे. खंडेराव, मोरगावातल्या मराठा महासंघात सामील व्हा राव! नाही तर कुणबी सेना?
हा प्रश्न फक्त ‘कुणबी’ या नामाभिधानाचा नाही. त्या कुणबी वास्तवाच्या वर्णनाचा-आकलनाचा आहे. पान १०५ ते १११ या सात पानांमध्ये जातिव्यवस्थेचं नमुनेदार आकलन वाचायला मिळतं. थोडी संपन्नता असेल तिथे कुठून कुठून लोक येऊन कामाला जोडून घेतात, आणि मग तिथली व्यवस्था त्यांना (आपल्या अटींवर) सामावून घेते, हे एक ढोबळ सूत्र पुढे येतं. ‘एकंदरीनं बाहेरून आलेले सगळे गावातल्या समाजात वेगवेगळ्या प्रकारे सामावून घेतले गेले... सगळ्या प्रकारचे संबंध ठेवून तरी एक समाज म्हणून राहणारी ही जातिव्यवस्था. रंगीबेरंगी फुलासारखे पाकळ्यांवर जिथे जागा सापडेल तिथे आपलं स्वतंत्र अस्तित्व सांभाळत एकमेकांना राखणारे आंतरसमूह. डौलानं पिढ्यांमागून पिढ्या हे लोक एकोप्यानं राहत आले.’ (११०) पुढे खंडेराव सांगतो- ‘सामावून घेण्याचा नेहमी एकच प्रकार असतो : पोटं भरा, तुमचं तुम्ही नीट राहा झालं.’
हा संपूर्ण उतारा म्हणजे एकांगी वर्णन, अर्ध्यामुर्ध्या ऐतिहासिक प्रक्रियांचा आधार आणि एक विशिष्ट मूल्यदृष्टी यांचं बेमालूम मिश्रण आहे. खंडेरावाला असणारं परिस्थितीचं आकलन म्हणून हे वर्णन यथातथ्यच आहे. बऱ्या पैकी संपन्न कुणबी घरातल्या तरुणाला ही सांस्कृतिक सरमिसळ आणि आर्थिक परस्परावलंबित्व या पुरेशा गोष्टी वाटू शकतात. पण आपला खंडेराव या कुणबी दृष्टीपासून बाजूला सरकून हे सगळं तपासून पाहू शकेल का?
एक तर यात कुणबी (आता काही बलुतेदार जाती) या स्थानिक, तर बाकीचे बाहेरून आलेले मानले आहेत. म्हणजे कृषिसंस्कृतीने आपल्याकडे आकर्षून घेतलेले अकृषी (भटके) समाज. पण तसं म्हटल्यानं त्यांना पूर्वी- गावात येण्यापूर्वी- जात नव्हती, उत्क्रांत कृषिसंस्कृतीने त्यांना जात बहाल केली, असं आपल्याला समजतं (अर्थातच प्रगतीमुळे जाती आल्या). पण मग गावातल्या कुणबी, सुतार, शिंपी, लोहार, महार, मांग, चांभार यांचं काय? आणि मग गावात ‘तरीही’ ‘एक समाज’ होतो तो कशामुळे? होतो का? खंडेराव म्हणतो, की अंतर ठेवून, विरोध ठेवून जातिव्यवस्था एक समाज म्हणून राहते. इतकंच नाही, तर त्या जातींचं मिळून रंगीबेरंगी फूल तयार होतं. अरेरे! खंडेराव, तुम्ही पुरातत्त्वाचे संशोधक. मढी-मडक्यांचं म्युझियम करू नये, हे तर पुरातत्त्वात तुम्ही शिकलाच असाल की राव! मग संघर्ष आणि स्पर्धेच्या कर्दमात रुतलेल्या जातिव्यवस्थेचं तुम्हाला रमणीय फूल दिसायला लागावं? जातिव्यवस्थेचं असं आदर्श रमणीयीकरण करत पुढे खंडेराव भलताच भारावून जातो- डौलानं.... एकोप्यानं राहत आले. कृषिव्यवस्थेतल्या अवलंबनाला एकोपा म्हणायचं तर म्हण बाबा, पण डौल? ‘तुमचं तुम्ही’ नीट राहण्यातला डौल? पुढे एका ठिकाणी (२००) हे वाक्य येतं : ‘मेंढपाळ, आदिवासी, भटके, महार-मांग-चांभार ग्रामव्यवस्थेशी फटकून राहिल्यामुळे फटिंग जगतात.’ म्हणजे कुणबीप्रधान, शेतीप्रधान ग्रामव्यवस्थेत सामावून जायचं तर त्या व्यवस्थेच्या अटींवरच की!
पण खंडेराव प्रामाणिक आहे आणि अस्वस्थ आत्मा आहे. तो जातिव्यवस्थेकडे या कुणबीप्रधान दृष्टीने बघत असला तरी त्या व्यवस्थेतून निपजणाऱ्या व्यवहारांमधला दुष्टावा तो नजरेआड करत नाही. उलट, ‘महारा-मांगांना जवळ न करण्याच्या’ प्रमादाबद्दल तो वारकरी संप्रदायाची चोखी संशयास्पद मानतो. एका ठिकाणी तर खंडेराव म्हणतो, ‘हजार- दोन हजार वर्षं समाजाच्या परिघावर घोटाळणार्यार किती तरी लोकांना आपल्या निर्दय गावगाड्याच्या पलीकडे कुठेही जागा नसावी?’ (३८३). म्हणजे प्रामाणिक संवदेनाशीलता, पण मूळ आकलनदृष्टीतच गफलत. इथेही पाहा: गावगाडा निदर्य खरा, पण इतर कुठेही ज्यांना जागा मिळत नाही त्यांना गावगाड्यात जागा आहे, असंच तो म्हणतोय.
‘डौलदार एकोपा’ हा खरं तर एकतर्फी एकोपा आहे याचं खंडेरावाला भान आहे. तो स्वत:लाच प्रश्न करतो, ‘हा एकतर्फी एकोपा हजारो वर्षांनंतर आमच्या डोळ्यांसमोर तुटला. आवळ्यांची मोट सुटली. कशामुळे?’ (१११)
‘मोडताही येत नाही म्हणून उभयपक्षी चालूच राहणारी- हा कोणत्या नामुष्कीवाण्या गुलामगिरीचा प्रकार आहे?’
‘पण हे मोडलं. ग्रामव्यवस्थेचा हजार वर्षं कोंडलेला श्वास मोकळा झाला...’ (१६७). हे कसं झालं?
खंडेरावाच्या मते महारांनी गावकीचे धंदे सोडले, हिंदू धर्म सोडला आणि आवळ्यांची मोट सुटली.
हिंदू धर्म सोडण्याचा हा क्षण कादंबरीत येतो तो मुख्यत: सवर्णांच्या आणि त्यातही कुणब्यांच्या दृष्टीतून. त्यामुळे त्याविषयीच्या आशंका, कुशंका या स्वाभाविक आहेत. मग गफलत काय आहे?
ती तीन पातळ्यांवर आहे. एक तर गावकी सोडल्याने नक्की काय फरक पडला याबद्दलची संदिग्धता कादंबरीच्या त्या भागात भरून राहिली आहे (१४९ ते १६७). पूर्वाश्रमीच्या महारांच्या वस्तीत बऱ्याच वर्षांनंतर खंडेराव जातो तेव्हा त्याला वारंवार समोर दिसणारं पोस्टर जणू त्याचा प्रश्न मुखर करतं. मुक्त कोणी कोणास केलं? खंडेरावजवळ या प्रश्नाचं उत्तर नाही, ही एक प्राथमिक गफलत. कारण त्यात कोणाला मुक्तीची निकड आहे/ होती याबद्दलचा बेहद्द ‘परातात्त्विक’ गोंधळ दिसतो. (पुरातत्त्वाचं संशोधन ते दुय्यम आहे. परातत्त्वाचा स्पर्श तो मुख्य - ५३३). दुसरी त्याच्याशी संलग्न गफलत म्हणजे महारादी जातींची गुलामी आणि अप्रतिष्ठा आणि इतर समूहांचे जीवनविषयक प्रश्न यांची खंडेराव कुणबीकेंद्री गल्लत करतो. ‘शेतकरी कुणब्यांना कष्ट करूनही सुरक्षितता आहे? आत्मप्रतिष्ठा आहे? बलुत्यांना तरी कुठे आत्मप्रतिष्ठा आहे?’ असे प्रश्न विचारून (१६७) खंडेराव आत्मप्रतिष्ठेचा प्रश्न सार्वत्रिक करून टाकतो. त्यामुळे जातिव्यवस्थागत कनिष्ठ जातींच्या आत्मप्रतिष्ठेचा प्रश्न दुय्यम बनतो. तरीही अर्थात, खंडेरावाला या आत्मप्रतिष्ठेच्या प्रकल्पाबद्दल एक दूरस्थ आपुलकी आहे. थोडाफार पुढारी झालेला आणि आता बौद्ध झालेला हरचंद खंडेरावाला भेटतो तेव्हा त्याच्या (हरचंदच्या) कोट-टोपी-घड्याळाची असूया न वाटता खंडेरावाला एक तटस्थ कौतुक वाटतं. ‘एकदम छान, नवं काही तरी’ जाणवतं. ते म्हणजे हरचंदचा आत्मविश्वा स. हे स्थित्यंतर कादंबरीत अत्यंत समर्थपणे टिपलं आहे. आणि तरीही तिसरी गफलत उरतेच. तीच तर पायाभूत गफलत आहे.

No comments:

Post a Comment