Wednesday, 8 March 2017

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव! -- सुहास पळशीकर (Page 2)

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!

खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भालचंद्र नेमाडे यांची अलिकडेच प्रकाशित झालेली बहुचर्चित कादंबरी. खंडेराव हा या कादंबरीचा नायक. या नायकाच्या आत्मसंवादातून लेखकाने भूत आणि वर्तमानातील माणसाच्या जगण्याचा मोठा पट मांडला आहे. मोठा आवाका असलेली अशी कादंबरी मराठीत दुर्मिळच. साहजिकच कौतुक, वाद, टीका असं सारं काही या कादंबरीच्या बाबतीत होत आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांनी केलेली या कादंबरीची चिकित्सा.
-२-
आणि तरीही आपल्याला माहिती आहे, की नेमाडे यांचा वैचारिक प्रकल्प जास्त गंभीर आणि गुंतागुंतीचा आहे. गाव आणि शहर या द्वैतामधलं गाव हे ‘कृषिसंस्कृती’चं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे खंडेरावाच्या गोष्टीत शेती, शेतीचं अर्थशास्त्र, शेतकरी समाज यांची चर्चा पुन्हा पुन्हा येते. शेतकरी हा या सगळ्या व्यवहारांचा केंद्रबिंदू. इथेही एक भानगड येतेच. ती म्हणजे कृषिकेंद्रित उत्पादन व्यवहारांच्या पलीकडचे (औद्योगिक) उत्पादन व्यवहार हे उपरे, बांडगुळी आणि शोषक व्यवहार आहेत, असं एक अस्फुट चित्र खंडेरावाच्या कथनाच्या पाठीमागे असल्यासारखं वाटतं. मात्र त्याची चर्चा नाही किंवा ते चित्र पुरेसं ठळकपणे रंगवण्याचा प्रयत्नही ही कादंबरी करीत नाही. मात्र ‘शेती’च्या विश्वामागचा वेध घेण्याचा प्रयत्न ती जरूर करते. या प्रयत्नाचा केंद्रबिंदू आहे खुद्द खंडेरावाचं कुटुंब. पण एकूण गावाची ओळख खंडेराव कशी करून देतो?
एक तर शेती करणारे हे कुणबी असतात, असं तो आपल्याला सांगतो. (म्हणजे पुन्हा जातीचा मुद्दा आला. शेतक-यांना ‘मराठा’ म्हणायचं की नाही? पण ही भानगड आपण जातीच्या मुद्द्याबरोबर निस्तरू.) कधी त्यांचा उल्लेख ‘खाऊन-पिऊन सुखी गरीब कुणबी’ (२०१) असा येतो, तर कधी ‘दरिद्री कुणबी’ (२०५) असा येतो. इतर वेळेला संवेदना आणि सांस्कृतिकता यांच्या अक्षांवर समाजजीवन तपासणाऱ्या खंडेरावाला मोरगावच्या शेतीसमाजाची चर्चा करताना मात्र ‘समाजशास्त्रीय’ व्हावं लागतं. पान १८७ ते २०५ च्या दरम्यान खंडेराव काय सांगतो ते पाहण्यासारखं आहे. निसर्गाच्या लहरीपणातून शेतकऱ्यामध्ये आलेली निर्विकार स्थितप्रज्ञता तो आपल्यापर्यंत पोचवतो: ‘या सगळ्यापायी थकून पाय लांब करून झोपी जाताना कुणबी काही राग-द्वेष न करता म्हणणार, चालायचंच गड्याहो, कव्हा गाड्यावर नाव, कव्हा नावेवर गाडं, चालूच आये... देवा, तूच एक आहे.’ (१८८) दुसरी गोष्ट सहज येऊन जाते ती शेतीच्या व्यवहारांची आणि निर्णयांची सामूहिकता. रात्री गल्लीगल्लीत सुख-दु:ख आणि अध्यात्म यांच्याबरोबरच शेतीच्या कामांची कशी चर्चा होते याची वर्णनं येतात (१९७). यातून मनावर ठसते ती कुणबी शेतकरी कुटुंबांच्या जीवनातील सामुदायिकता आणि देवाणघेवाण. इथे खासगी काही ते उरतच नाही. जो काही मनात सल असेल त्याचा जाहीर उच्चार आणि शेतीतल्या प्रश्नांवर जाहीर सल्ला. समुदाय जीवनाचं हे चित्र नक्कीच वास्तवाला धरून असं आहे. (पण हे समुदायविश्व् ‘कुणब्यां’चं आहे का सार्यां गावाचं, हा प्रश्न मानगुटीवर बसल्यावाचून राहत नाही.)
आणि पुन्हा हे सगळे कुणबी शेतकरी ‘गरीब अल्प भूधारक’ आहेत, हेही खंडेराव सांगतो. गावातले नव्याण्णव टक्के शेतकरी असेच दोन-चार बिघे जमीनवाले (२००). ‘या अल्प भूधारक गरीब शेतकर्यां च्या जराशा वरच्या सांपत्तिक पातळीवर जगणारे, स्वत:ला वजनदार शेतकरी म्हणवून घेणारे’ गावात दहा-पंधरा होते. आपल्याला वाटतं, की आता खंडेराव या ‘शेतकरी समुदाया’तल्या अंतर्गत द्वंद्वाबद्दल आपल्याला सांगणार. पण कसचं काय! ‘यांची स्थिती म्हणजे जास्त ओझं वाहणाऱ्या बैलांसारखी,’ असं सांगून तो चक्क ते द्वंद्व नाकारतो (२०२). अर्थात कृषिसंस्कृतीच्या अस्तित्वाचं आणि यशाचं श्रेय तो स्त्रीश्रमाच्या ‘आदिम नारीनृत्याला’ देतो- ते वर्णन हलवून टाकणारं आहे. पण ही धारदार संवेदना आणि चिकित्सावृत्तीची कु-हाड तो ‘शेतकरी समुदाय’ नावाच्या वास्तव-कल्पितावर का चालवत नाही, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
तरीही एकांगीपणाचा आरोप खंडेरावावर करता येत नाही. उलट, इथे एक वेगळाच गुंता आपल्यापुढे येऊन उभा ठाकतो. खंडेरावाच्या कळत्या आयुष्याचा मोठा भाग हा त्या शेतीच्या रगाड्यापासून अलिप्त राहण्यात आणि दूर पळण्यात व्यतीत झाला आहे. म्हणजे कृषिसंस्कृती, शेतकरी समुदाय आणि शेती व्यवहारांची रमणीय गुंतागुंत यातूनही काही तरी टोचणारं असं शिल्लक आहे. ते कादंबरीत पुरेसं व्यक्त होत नाही. खंडेरावाला आपलं कुटुंब, त्याचा शेतीचा बारदाना यांच्याबद्दल एक अढी आहे ती या शेतीव्यवस्थेबद्दल आहे, तिच्या सांप्रत स्वरूपाबद्दल आहे की व्यक्तीला पुसून टाकण्याच्या तिच्या सामुदायिकतेबद्दल आहे? भावाच्या मृत्यूनंतर आतपासून हलून गेलेल्या खंडेरावाला त्या अवस्थेतही आता आपणच एक सुपुत्र उरलो, हे जाणवल्याशिवाय राहत नाही. आपल्या संपन्न शेतकरी कुटुंबाच्या सर्व गिळंकृत करणाऱ्या सामुदायिकतेपासून दूर पळण्यासाठी खंडेरावाला भावडूची ढाल होती. हा त्याचा भाऊ दोघा भावांच्या वतीने शेतीच्या सामुदायिकपणाच्या बकासुराचा स्वेच्छाबळी बनला होता. आता खंडेरावाचा नंबर.
वडिलांच्या मृत्यूने खंडेरावाच्या व्यक्तित्वाभोवतीचे ‘शेतकी व्यवस्थे’चे फास आणखी आवळले जातात. बहुधा त्या चिंतादग्ध अवस्थेत खंडेरावाला लक्षात येतं, की आपण नेमक्या याच ‘कुणबी कृषिसंस्कृती’पासून तर आतापर्यंत दूर पळत राहिलो. ‘...क्रूर मार्गांनी कुणबी संस्कृती... अहिंसेचं मृगजळ पाजत आली आहे...’ (४००-४०१) असं तो उद्वेगाने म्हणतो. ‘शेतीमुळे ह्या लोकांच्या सगळ्या सौंदर्यभावना नष्ट झालेल्या आहेत. नाचणं, गाणं तर नाहीच. केवळ स्वार्थापलीकडे ग्रामीण कृषिसंस्कृतीत काही उरलेलं नाही. खंडेराव, सगळा चोथा.’ (४०२).
म्हणजे खंडेरावाचं हृदय परिवर्तन झालं की काय? का खंडेरावानं कृषिसंस्कृतीतून पक्षांतर केलं? तर सावधान! पुढचाच परिच्छेद पाहा. त्यात थेट शारीरिक श्रम आणि बौद्धिक काम यांच्यातला झगडा दाखवला आहे. ‘स्वत:च्या मेहनतीनं कापूस उत्पादन करणाऱ्यांपेक्षा फॅशनेबल धंदे करणारे शहरी पांढरपेशे अधिक सुंदर कपडे वापरतात...’ ‘हा पांढरी-काळीचा झगडा सहा हजार वर्षांपासून चालू आहे...’ वगैरे सांगत खंडेराव थेट न्यूयॉर्क महानगर जमिनीखाली केव्हा जाईल, असा सत्त्वसंतप्त सवाल उभा करून आपल्याला गारद करून टाकतो.
म्हणजे कुणबी कृषिसंस्कृतीवरची टीका ही तिच्या स्वभावस्थ वैशिष्ट्यांमुळे नसून, ती वैशिष्ट्यं टाकून देऊन फक्त ‘चोथा’ शिल्लक राहिल्याबद्दल आहे. कुणबी कृषिसंस्कृतीचं खंडेरावाच्या दृष्टीनं गाभ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेवढ्यास तेवढं पिकवून पोट भरणं. पण हरितक्रांतीनं घात केला. ‘नगदी पिकं पेरून विहिरी उपसण्याचा चंग शेतकऱ्यांनी बांधला.’ (ज्या थोड्यांकडे पाणी/विहिरी आधीच होत्या त्यांची बरोबरी कशाला? काही थोडे राहिले वजनदार तर बिघडलं कुठे? देवा, तू एकच!) ‘गावाबाहेरचं गाव गाव चौपट झालं.’ ‘दुसऱ्या कोरडवाहू गावांमध्ये चार-पाच रुपये रोज तर इथे दहा रुपये- तेही नगद...’ (फालतूचीच कमाई म्हणायची की खंडेराव!) ‘बैलांची शेती जुनाट होत चालली. ट्रॅक्टर, चक्क्या, मळणीची यंत्रं येत गेली.’ (तेवढेच बायाबापड्यांचे अवाढव्य श्रम जरा कमी झाले असतीलच की!) या सर्व विधानांमागे एक अध्याहृत विधान आहे- की समाज बिघडायला लागला. पण मग त्या प्रत्येक विधानावर कंसात (प्रस्तुत लेखकाने) केलेलं भाष्य शिल्लक राहतंच. खंडेराव, तू फक्त गोष्टच सांगत जा राव! पण ऐकेल तर तो खंडेराव कसला? उलट, खंडेरावाला आमच्यासारख्या बिगरकृषिसंस्कृतीवाल्यांचे आक्षेप जणू आधीपासूनच माहिती असणार. त्यांची विल्हेवाट तो पुढच्याच वाक्यात कशी लावतो पाहा : ‘बारमाहू काबाडकष्टू कोरडवाहू फाटकूतुटकू शेणखतू मरूमरू टुकूझुकू शेती कालबाह्य होत चालली. शेतकऱ्यांची संपन्नता वाढली.
आता या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा? नुसतं वर्णन? की पक्षपाती निवेदन? खंडेरावाची गोष्ट काय सांगते पाहा: एक गणू गोंधळ्याचं पडकं घर फक्त पूर्वीसारखंच गात राह्यलं :
कोळी कोष्ट्यानं वो घर बांधिलं सुख भोगण्याला होऽ होऽ
सुख भोगण्याला न् आतमध्ये घुसूनच मेला होऽऽ...
पुरातत्त्ववेत्ते खंडेराव यांचं निदान? समाजशास्त्री खंडेरावांची भविष्यवाणी? ऋषीवर खंडेरावांची शापवाणी?
बरं, हरितक्रांती म्हटलं तर भांडवली विकासाचाच एक भाग होती. तिची चिकित्सा, चिरफाड, ताळेबंदाची झाडाझडती व्हायला हवीच. पण हरितक्रांतीपूर्वी काय कृषिसंस्कृती होती? मुळात समाज स्थिरावस्थेत समाधिस्थ नसतात, हे पुरातत्त्व संशोधक खंडेरावाला सांगायला नकोच. पण जर एक-एक पाऊल मागे जाऊन पुढे झालेल्या प्रगतीचा पर्दाफाश करू म्हटलं, तर भांडवली हरितक्रांतीपूर्वी सरंजामी व्यवस्था या ना त्या स्वरूपात असणार. ती भांडवली हरितक्रांतीपेक्षा परवडली, असं म्हणणं (आपल्याला) अवघड जातं. खरं तर तसं म्हणणं खंडेरावालाही अवघडच. पण तो बहाद्दर अशा वेळी आपल्यामधल्या समाजशास्त्राला पायजम्याच्या खिशात दाबून ठेवून एका भूतकालीन कल्पितादर्शाशी वर्तमान अधिक-उण्याची तुलना करतो.
तरीही खंडेरावाविषयीचं आपलं आकर्षण सरत नाही. कारण तिरीमिरी आल्यावर तो हिंस्रपणे सांगून टाकतो, की ‘रेड्यांना नुस्तं ताक पाजत पाजत शेवटी मारून टाकायचं, हा कृषिसंस्कृतीतला अलिखित अहिंसक कायदा’ (४००). त्याच्या या हिंस्र प्रामाणिकपणाचं कारण आपण पुढे पाहणार आहोत त्याप्रमाणे हेच, की शेवटी कृषिसंस्कृती हासुद्धा ‘उत्क्रांती’मधला एक टप्पा आहे. खंडेरावाचं उग्र भांडण त्या उत्क्रांतीशीच तर आहे!

No comments:

Post a Comment